ग्रा.पं.नांदेड येथील बेकायदा गौणखनिज बुडविल्याप्रकरणी बीडीओ यांना धरणगांव तहसीलदार यांनी दिले चौकशीचे आदेश…

(प्रहार Today वृत्तसेवा) धरणगांव :- मौजे नांदेड ता.धरणगांव येथील दि.१२/१२/२०१८ ते दि.१७/०८/२०२० या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या विकास कामांच्या बेकायदा गौण खनिज बुडविल्याप्रकरणी महाराष्ट्र जमीन व महसूल अधिनियम, १९६६ नुसार स्वामित्व धनाची (रॉयल्टी) रक्कम दंडासह वसुलीची कारवाई होणे बाबत अमळनेर येथील माहिती अधिकार कार्यकर्त्या कडून, धरणगांव तहसिलदार श्री.महेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण :- अमळनेर येथील माहिती अधिकार कार्यकर्त्या कडून, ग्रामपंचायत नांदेड येथे माहितीच्या अधिकारातून दि.१२/१२/२०१८ ते दि.१७/०८/२०२० या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या विकासकामांच्या ३/१, ३/२, ३/३ असे एकूण ३ अर्जांनुसार माहितीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार विद्यमान जनमाहिती अधिकारी यांनी दाखल अर्जांचे मुद्देनिहाय व कारणमीमांसासह उत्तर दिल्याने, सदर ग्रामपंचायत येथील तत्कालीन ग्रामसेवक श्री.मुरलीधर एकनाथ उशीर (हल्ली कार्यरत ग्रा.पं.म्हसावद ता.जि.जळगांव) व वाहतूकदार यांनी रॉयल्टीची (स्वामित्वधन) रक्कम महसूल प्रशासनाकडे जमा करणे अपेक्षित होते व आहे. तर दुसरीकडे वाहतूकदार यांनी ग्रामपंचायत सचिवाकडे देयकासोबत रॉयल्टीच्या पावत्या जोडणे बंधनकारक होते व आहे.

देयकासोबत रॉयल्टीच्या पावत्या सादर न केल्यास, ग्रामपंचायतीने संबंधित कंत्राटदारांचे व  वाहतुकदाराचे देयके अदा करू नये. अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) मध्ये दिलेल्या आहेत. या नियमाला धाब्यावर बसवून, तत्कालीन ग्रामसेवक श्री.मुरलीधर एकनाथ उशीर (हल्ली कार्यरत ग्रा.पं.म्हसावद ता.जि.जळगांव) यांनी संगनमताने ठेकेदार / कंत्राटदार / वाहतूकदार यांची नियमबाह्य देयके अदा केलेली आहेत. व करून घेतलेली आहेत. त्यानुसार सदरची रक्कम वसुलीस पात्र असल्याने, जबाबदार असणाऱ्या व्यक्तीच्या वेतनातून सदरची संपूर्ण रक्कम दंडासह तात्काळ वसूल करण्यात यावी. असे तक्रारीत म्हटले आहे.

काय आहेत विकासकामे :- १४ वा वित्त आयोग निधीतून पेव्हर ब्लॉक-र.रु.१,९५,९५०/-, पेव्हर ब्लॉक -१ ते ४ र.रु. १४,७५,०४०/-,   ग्रा.पं.कार्यालय दुरुस्ती र.रु. ३९,६००/-, सार्व. शौचालय भाग १ ते २ र.रु. ७२,९९६/-, भूमिगत गटार भाग १ ते २ र.रु. ४,९१,३००/-, रस्ता कॉक्रीटीकरण र.रु. ४,८१,५२०/-, पेव्हर ब्लॉक-र.रु.१,६२,५००/-,  इत्यादी. र.रु.२९,१८,९०६/- ची बांधकामे केलेली आहेत.

ग्रामनिधीतून रस्ता कॉक्रीटीकरण व पायरी बांधकाम करणे – अशी एकूण र.रु.८,९९,१८५/- ची बांधकामे कामे केलेली आहेत.

दलित वस्ती सुधार योजनेतून शौचालय बांधकाम – र.रु. १,९६,९०३/-, रस्ता कॉक्रीटीकरण करणे र.रु. १,६०,०००/-, रस्ता कॉक्रीटीकरण करणे भाग १ ते ३ र.रु.८,६१,९७७/- अशी एकूण र.रु.१२,१८,८८०/- ची कामे बांधकामे केलेली आहेत. एकूण र.रु. ५०,३६,९७१/- बांधकामे केलेली आहेत.

काय आहेत वसुलीचे नियम :- ती कामे करण्यापूर्वी स्वामित्व धनाची (रॉयल्टी) रक्कम महसूल व वन विभाग अधिसूचना दि.१५/०५/२०१५ व महसूल व वन विभाग अधिसूचना दि.०४/०६/२०२० नुसार गौणखनिज स्वामित्वधनाच्या सुधारित दरानुसार रु.१४१.३४ व २१२ प्रती घनमीटर प्रमाणे स्वामित्वधन ग्रामपंचायतीने किंवा ठेकेदाराकडून वसूल करणे आवश्यक होते व आहे.

सदर तक्रार अर्जावर धरणगांव तहसिलदार श्री.महेंद्र सूर्यवंशी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगांव यांना चौकशीचे आदेश दि.१७/१२/२०२४ रोजी देण्यात आलेले असून, लवकरच सदर ग्रामपंचायतीची आम्ही चौकशी करून, अहवाल सादर करण्यात येईल असे गटविकास अधिकारी धरणगांव यांनी सांगितले आहे.

 

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!