जळगांव जिल्ह्यात लाच घेताना तलाठ्यासह एकजण ‘एसीबी’च्या जाळ्यात.

( प्रहार Today वृत्तसेवा ) पारोळा : सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याच्या मोबदल्यात एक हजारांची लाच घेणाऱ्या तलाठीसह एका खाजगी पंटरला जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तलाठी नाव सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३४ वर्ष, रा. वर्धमान जैन, पारोळा), खाजगी पंटर शरद प्रल्हाद कोळी (वय ४३ वर्ष, रा. चोरवड ता.पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई सोमवारी दि.३० सप्टेंबर दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास करण्यात आली. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात तक्रारदार हे आपल्या परिवारासह राहत असून कुटुंबियांच्या नावे त्यांचे लोणी बुद्रुक शिवारात शेत आहे. या शेतजमिनीवर तक्रारदार यांना गावातील ‘विविध कार्यकारी सोसायटी’ मधून कर्ज घेण्यासाठी त्यांच्या शेतजमिनीवर असलेल्या सातबारा उताऱ्यावर बोजा लावणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार हे चोरवड येथील तलाठी कार्यालयातील तलाठी सुभाष वाघमारे यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, तुमच्या व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढण्याच्या मोबदल्यात ४ उताऱ्यांचे प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ८०० रुपये आणि मागील कामाचे दोनशे रुपये असे एकूण १ हजार रुपये द्यावे लागतील. त्यानुसार तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली. दरम्यान पथकाने काल सोमवारी दुपारी ३:०० वाजता सापळा रचला. त्यानंतर तलाठी वाघमारे याने तक्रारदाराला खाजगी पंटर शरद कोळी यांच्या फोनपेवर पैसे टाकण्यास सांगत लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याने, पथकाने दोघांना अटक केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!