(प्रहार Today वृत्तसेवा) धुळे – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दिनांक १८ जुलै २०२४ रोजी दुपारी धडाकेबाज कारवाई केली आहे. धुळे तालुक्यातील फागणे ग्रामपंचायत मधील लाचखोर चौघांना ४ हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या चौघांमध्ये फागणेचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील, सरपंच यांचे पती नगराज हिलाल पाटील, लिपीक किरण शाम पाटील व ग्राम रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांचा समावेश आहे. मालमत्ता क. ६५१ (मिळकत क. २०२५) क्षेत्र ४५० चौ. फुटाचे सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले आहे. तक्रारदाराच्या घराचे अतिक्रमण नियमानुसार कमी झाले असल्याने, अतिक्रमणाची नोंद कमी होवुन अद्यावत सुधारित नमुना नं.८ घराचा उतारा मिळण्याकरीता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील व सरपंच यांचे पती नगराज हिलाल पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय फागणे येथे जावुन भेट घेतली. तेव्हा त्यांनी तक्रारदारच्या घराचा नमुना नं.८ वरील अतिक्रमण नियमानुकुल झाल्याची नोंद करून, अद्यावत असा उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रूपये लाचेची मागणी केलेली होती. याबाबत तक्रारदाराने थेट धुळे एसीबीकडे तक्रार दिली.
त्यानुसार दि.१६ रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, सरपंच यांचे पती नगराज हिलाल पाटील व ग्राम रोजगार सेवक पितांबर शिवराम पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब नामदेव पाटील यांना ४ हजार रूपये लाच देण्याकरीता प्रोत्साहित केले. तसेच आज दि. १८ जुलै २०२४ रोजी ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब नामदेव पाटील यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रुपये लाचेची मागणी करीत, लाचेची रक्कम लिपीक किरण पाटील यांचे हस्ते स्विकारल्याने चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. चौघांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७-अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, प्रविण पाटील, संतोष पावरा, सुधीर मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, जगदीश बडगुजर यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.