(प्रहार Today वृत्तसेवा) पारोळा शहरातील धुळे ते धरणगाव बायपास रोडवर मोटारसायकलवरून अवैधरित्या गावठी बनावट पिस्तुल आणि जिवंत काडतूस घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात पारोळा पोलीसांना यश आले आहे आहे. आरोपींकडून पिस्तुल, काडतूस, मोटारसायकल तसेच दोन मोबाईल असा एकुण ६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तरीदोघांवर पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा शहरातील धुळे- धरणगाव बायपास जवळ २ व्यक्ती दुचाकीवरून गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पारोळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी २२ जून २०२४ रोजी रात्री सुमारे ११ वाजता सापळा रचून दुचाकी थांबविली यावेळी संशयित आरोपी शामकांत एकनाथ पाटील व भिकन तुकाराम पाटील दोन्ही रा. पारोळा या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट गावठी कट्टा पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले. त्यानुसार अधिक चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत होते. दरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल दोन जिवंत काडतूस, मोटारसायकल व दोन मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर आर्म ॲक्ट १९५९ अन्वये, पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.