अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर :- नैसर्गिक आपत्तीत राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत असून खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा निधी उपलब्ध होणार असल्याने या शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळेल. तसेच या निर्णयामुळे राज्य शासनाने
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील व्यक्त केला.
मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, राज्यातील ४० तालुक्यांमध्ये खरीप हंगाम २०२३ मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल होता. या तालुक्यातील बाधित शेतकरी खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आले. त्यानुसार दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना ही मदत होणार आहे. हा शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून वितरण करण्यास मान्यता दिली असल्याचेही मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.