विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार – शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

जळगांव प्रतिनिधी

जळगाव – येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभागाचे आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज दि. ९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात झाले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी हे होते तर प्र-कुलगुरु प्रा.एस.इंगळे यांचीही उपस्थिती होती.

उदघाटनानंतर विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात मुख्य समारंभ झाला. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी भाषणाच्या आधी विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रश्न विचारण्याची संधी दिली. यामध्ये दोन विद्यार्थी, एक प्राध्यापक यांनी प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देतांना एक महत्वाची घोषणा करावयाची आहे. मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: संवदेनशील असल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्क माफी विषयी चर्चा केली होती. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या ६४२ आणि नव्याने सुरु होणाऱ्या २०० अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात एकाही विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही. कववित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला स्थापनेनंतर शिक्षकांची नवीन पदे मंजूर झालेली नाहीत. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी येत्या मंगळवारी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन आजवर विद्यापीठाने शिक्षक पदांसाठी दिलेले प्रस्ताव आणि त्यांची स्थिती याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतेली जाईल असे आश्वासन दिले. माजी प्राचार्य अनिल राव यांनी याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या विद्यापीठात प्लेसमेंटसाठी सातत्याने मोठया कंपन्या याव्या यासाठी आपण स्वत: काही कंपन्यांशी बोलू असेही ते म्हणाले.

गेल्या दीडवर्षात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. या शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिकावर अधिक भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक आहे. अगदी ग्रामीण भागातील महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी देखील ग्रामपंचायत कार्यालयात इंटर्नशिपचा अनुभव घेऊ शकतील. या धोरणात ७०टक्के अभ्यासक्रम हा विषयाशी निगडीत असला तरी ३० टक्के अभ्यासक्रम हा व्यक्तिमत्व विकासाला पूरक ठरणारा आहे असे सांगून चंद्रकांतदादा पाटील यांनी जर्मन देशाला कौशल्य असलेले ४ लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकण्यापासून ते थेट जर्मनीत जाण्यापर्यंतचा खर्च घेण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असेही ते म्हणाले. नवीन २ हजार प्राध्यापकांच्या भरतीला परवानगी मिळावी यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. प्राध्यापकांनी विद्यार्थी हितासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. विद्यापीठाच्या विविध प्रस्तावांना राज्यशासनाने सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या समारंभात विद्यापीठाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील नेमाडे यांचा चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.एस.टी.भुकन, प्रा.सतीष कोल्हे, प्रा.शिवाजी पाटील, ॲड.अमोल पाटील, डॉ.पवित्रा पाटील, सहसंचालक डॉ.संजय ठाकरे, सीए रवींद्र पाटील, प्रा.योगेश पाटील, विद्यापीठ सल्लागार परिषदेचे सदस्य यजुवेंद्र महाजन हे उपस्थित होते.

क्रीडा संकुलात सुरु झालेल्या योग विभागाच्या उदघाटन प्रसंगी विभागप्रमुख इंजि.राजेश पाटील आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारत उदघाटन प्रसंगी संचालक प्रा.मनीषा इंदाणी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, प्राचार्य एस.एस.राजपूत आणि डॉ.जगदीश पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या गांधी टेकडीलगत चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!