धरणगांव (प्रहार Today वृत्तसेवा) ग्रा.पं. रोटवद ता.धरणगाव येथील तत्कालीन व सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी श्री. पंजाबराव विनायकराव पाटील यांनी दिव्यांग नसतांनाही दिव्यांग असल्याचे भासवून, बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांगाची सेवापुस्तकी नोंद घेऊन, दिव्यांगांचे आर्थिक लाभ फसवणुकीने घेतले आहेत. त्यानुसार त्यांनी दि.०८/०८/२०२२ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगांव येथिल udid प्रणालीतून Hearing Impairment कर्णदोष २% असलेले तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. शासकीय लाभासाठी ४०% वरील व्यक्तींनाच पात्र समजले जाते. त्यानुसार सुधारित प्रमाणपत्राची सेवापुस्तकी नोंद घेणे, दिव्यांगाचे घेत असलेले आर्थिक लाभ तात्काळ बंद करणे आवश्यक असतांना, केवळ आर्थिक हितापोटी त्यांनी तसे न करता, शासनाची फसवणूक करून, सदर लाभ घेतच राहिले. सदर प्रकारणाची सखोल व सूक्ष्म चौकशी करून, फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच संपूर्ण कारवाई पूर्ण होई पावेतो त्यांना सेवानिवृत्तीचा आर्थिक लाभ अदा करण्यात येऊ नये. अशी तक्रार श्री.योगेश मोहन पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांना ऑनलाईन केली आहे. सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार जिल्ह्यात दबदबा असणारे श्री.पंजाबराव पाटील हे अडचणीत येणार की, सदर प्रकरणाकडे संगनमताने दुर्लक्ष होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.