जळगांव प्रतिनिधी
जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या बाबत ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत. त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरण होती. त्याची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
केळी पीक विम्या बाबत 2 फेब्रुवारी रोजी विविध संघटनाकडून मोर्चा काढला होता. त्याअनुषंगाने ठरल्याप्रमाणे 14 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, मुमराबाद कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, बाळासाहेब बाळके, अभिनव माळी, भरत वारे व डी.बी. लोंढे, रावेर, मुक्ताईनगर, यावल व चोपडा या तालुक्याचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकूण केळी पीक विमा प्रस्तावा मध्ये जिल्हयातील 10619 नामंजूर करण्यात आले आहेत त्या प्रस्तावांमधील बहुतांश केळी पिकाचे क्षेत्र हे चोपडा, यावल, रावेर, जळगाव व मुक्ताईनगर या तालुक्यातील असल्याने तेथील तालुका कृषि अधिकारी यांना देखील या बैठकीला बोलावण्यात आले होते. त्यानुसार रावेर तालुक्यातील 4331 , तर यावल तालुक्यातील 1377, मुक्ताईनगर मधील 768, तर जळगाव मधील 1427 व चोपडा तालुक्यातील 1562 व इतर तालुक्याची संख्या पाचशेच्या आसपास आहे. या सर्व शेतक-यांचे पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी 5235 शेतक-यांनी तालुकास्तरीय समिती कडे अपील दाखल करण्यात आलेले आहेत,त्यापैकी 3856 अपील पात्र असुन 1379 अपील अपात्र करण्यात आलेले आहे. पण तालुकास्तरीय समितीकडे अपील दाखल करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला याबाबत पात्र शेतकऱ्यांच्या हक्काची विमा रक्कम मिळावी यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.