ग्रामसेवकासह शिपाई लाच घेतांना रंगेहाथ जळगाव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

मुक्ताईनगर (प्रहार Today वृत्तसेवा) :  आज १६ मे २०२४ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे राजुरा ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायत शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांना ६ हजाराची लाच घेतांना जळगाव येथील लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

राजुरा ग्रामपंचायत येथील तक्रारदाराने आईच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ग्रामपंचायत दप्तरी मुलाचे नावे फेरफार करण्यासाठी विनंती अर्ज सादर केला होता. मात्र तशी फेरफार करण्यासाठी ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके याने तक्रारदारास ११ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती.

राजुरा ग्रामपंचायत सचिव मनोज सूर्यकांत घोडके आणि शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी तक्रारदाराकडून ठरलेल्या ११ हजारांपैकी सहा हजारांची लाच स्वीकारली असता, त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालून लाच स्वीकारलेली सहा हजारांची रक्कम हस्तगत करून दोघांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्यवेक्षक अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पो.नि. अमोल वालझाडे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. अमोल सूर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!