धरणगांव (प्रहार Today वृत्तसेवा): तालुक्यातील पाळधी येथे खाजगी आराम बस शनिवारी दि.२७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पलटल्याने ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगांवचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सुरत येथून शुक्रवारी संध्याकाळी सुरत- अकोला ही खाजगी आराम बस निघालेली होती. शनिवारी दि.२७ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात बस आली व त्याच ठिकाणी अचानक टायर फुटल्याने सदर बस पलटली. यामध्ये पाच जण गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. त्याच गावात रहिवास असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. व जखमींना बस बाहेर काढून त्यांनी रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी रवाना केले. पाळधी दुरक्षेत्र पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. घटनेमध्ये विद्या सागर निगडे (वय ४०), सोनू अंकुश मिस्तरी (वय २७), कौतिक सुपडा गवळी (वय ५०), आशाबाई सुभाष भोसले (वय ४५, सर्व रा. सुरत) यांच्यासह १२ वर्षीय अर्चना स्वामी निकडे (रा. काठोध जि.बुलढाणा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.